शपथविधीला पारनरेच आमदार नीलेश लंके, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. तर कोपरगावचे आमदार आशुतोश काळे प्रदेशात आहेत. मात्र, प्रदेशात असलेले आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे काळे हेही त्यांच्यासोबत असल्याचे मानले जाते. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे ते आणि रोहित पवार वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. बालेकिल्ल्यातील ते दोघेच आता मूळ पक्षासोबत उरले आहेत.
नगर जिल्ह्यातील या पडझडीबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. पारनेरचे लंके नेहमी बोलताना पवार यांना आपले दैवत मानत. पवार यांचाही त्यांचा मोठा विश्वास. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास आणि घरीही पवारांनी भेट दिली आहे. पूर्वी शिवसेनेत असलेल्या लंके यांनी या निवडणुकीच्यावेळी पक्षात प्रवेश केला, तेव्हापासून पवार त्यांना ताकद देत होते. एवढेच नव्हे तर आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणूनही त्यांना पुढे करण्यात आले होते. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात त्यांच्या मतदतीने मोर्चेबांधणी करण्यात येत होते. लंके आणि विखे यांच्यात कमालीचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लंकेनी पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता विखे आणि त्यांच्यातील संबंध भविष्यात कसे राहणार? याचीही उत्सुकता आहे.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि आणि त्यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप हेही पवार यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. त्यामुळे एकाच घरात दोन आमदारही पक्षाने केले होते. मागील निवडणुकीत विखे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी जगताप यांनाच पुढे करण्यात आले होते. शिवाय तरुणांना संधी द्यायची, या धोरणानुसार पवार यांनी संग्राम जगताप यांना आणखी जवळ केले होते. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्याच्यावेळी जगताप आणि रोहित पवार हे दोघेही पवार यांच्यासोबत होते. पूर्वीच्या बंडावेळी जगताप अजितदादांसोबत गेले खरे, मात्र लगेच परत आले होते.
अकोल्याचे किरण लहामटे यांनाही पवार यांनी पक्षात घेत आमदारकीची संधी दिली होती. तर आशुतोश काळे यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद देण्यात आले होते. अशा परिस्थितीत या चौघांचे पवार यांना सोडून जाणे जिव्हारी लागणारे आहे.
जयंत पाटील यांचे भाचे असलेले तनपुरे मागील सरकारमध्ये राज्यमंत्री होते. पवारांचे नातू रोहित पवार हे पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करीत असल्याचे मानले जाते. त्यांनाही पवार यांच्याकडून अनेक पदे मिळाली. पक्षातही वजन वाढत आहे. रविवारी पत्रकार परिषेदच्यावेळी ते पवार यांच्यासोबत उपस्थित होते. भविष्यात रोहित पवार यांना आणखी नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील जे आमदार अजितदादांसोबत गेले आहेत, त्यांच्या मतदारसंघात सध्या तरी राष्ट्रवादीकडे दुसरा सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे याचा फटका बसू शकतो. पक्षाचा बालेकिल्ला ही ओळख टिकवायची असेल तर पवारांना नगर जिल्ह्यातही मोठे काम करावे लागणार आहे.