• Sat. Sep 21st, 2024

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

ByMH LIVE NEWS

Jul 2, 2023
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

बुलढाणा, दि. २ : समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांनी अग्नि दिला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यात तेजस पोकळे वर्धा, करण बुधबावरे वर्धा, वृषाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिषा प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुशील खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीषा बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्यावर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. श्री. महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही. आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे. अपघातातील केवळ चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र 21 मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी सहमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांच्या सर्व कुटुंबियांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे. कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील.

यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed