याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप जाधव यांनी दीड वर्षापूर्वी महेश या मुलाला दत्तक घेतले होते. ते एकटेच राहत असल्याने ते महेशच्या घरातून डबा घेऊन जात होते. कौटुंबिक ताणतणावात नेहमी वावरत होते. मंगळवारी दुपारी दत्तकपुत्र महेश याला त्यांनी बोलावून घेतले. ‘मला चायनीज खायचे आहे’ असं सांगून ते त्याला यशवंतराव चव्हाण कॉलेज परिसरात घेऊन गेले. दोघांनी चायनीज खाल्ल्यानंतर पुन्हा त्यांनी मला राजवाडा परिसरात फिरायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर मुलाने राजवाडा परिसरात दुचाकीवरून नेले. तेथे फिरल्यानंतर दोघेजण गोडोलीत गेले.
मी सदर बझारला जातो, असे सांगून वडील संदीप जाधव निघून गेले. मात्र, काही वेळात परत दत्तक मुलगा राहत असलेल्या इमारतीजवळ आले. चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी थेट खाली उडी मारत जीवनयात्रा संपवली. ही माहिती कळताच मुलगा महेश याने खाली येऊन पाहिले असता वडिलांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आत्महत्येची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी येऊन जाधव यांना तपासले असता ते मृत झाल्याचे घोषित केले.
जिल्हा रुग्णालयात रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री महेश घरी आल्यानंतर मोबाइलचे नेट त्याने सुरू केले. त्यावेळी वडील संदीप जाधव यांनी आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे त्याला दिसले, हा मेसेज पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हा मेसेज लवकर पाहिला असता तर कदाचित वडिलांचा जीव वाचू शकला असता. मोबाईलचे इंटरनेट बंद ठेवल्याचा पश्चात्ताप वाटत असल्याचे मुलाने सांगितले.
जाधव यांनी कोणाच्या त्रासामुळे आत्महत्या केली. नेमकी कशी केली? टेरेसवर जाताना त्यांना कोणी पाहिले आहे का? या कारणांबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिस कसून तपासणी करत आहेत. या तपासानंतरच या आत्महत्येच गूढ समोर येणार आहे.