• Sat. Sep 21st, 2024

पिंपरी पोलिसांचा मास्टरप्लॅन; ‘नवशिक्या’ भाईंना आता भाईगिरीची चटक पडणार महागात, कारण…

पिंपरी पोलिसांचा मास्टरप्लॅन; ‘नवशिक्या’ भाईंना आता भाईगिरीची चटक पडणार महागात, कारण…

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : एकही गुन्हा नावावर नसला, तरी गुन्हेगारी मानसिकता असणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात राहणे, गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत भविष्यात भाईगिरीची स्वप्ने रंगविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि संबंधितांना ताळ्यावर आणण्यासाठी पिंपरी पोलिसांनी कंबर कसली असून, भविष्यात गुन्हेगारीचा मार्ग चोखाळणाऱ्या संभाव्य भाईंची ‘कुंडली’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

याशिवाय अनेक ‘नवशिक्या’ भाईंना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यावरही भर देण्यात येत आहे. पोलिसांनी उचलेल्या या पावलामुळे शहरातील या ‘मुन्नाभाईं’ची पाचावर धारण बसली आहे. शहरात पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली होती. त्यातून शहरातील एक हजार ५१३ आरोपींची माहिती समोर आली.

पूर्वीच्या रेकॉर्डनुसार संघटित टोळ्यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे तयार आहे. मात्र, त्यातील अनेक जण मरण पावले आहेत. अनेकांचे केवळ रेकॉर्ड असून, मागील सहा ते सात वर्षांत त्यांचा गुन्हेगारी घटनांशी संबंध राहिला नसल्याचीही नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. असे असले, तरी शहरातील अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे आढळून येत आहे. त्याचबरोबर पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नसलेल्यांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शहरात एखादा गुन्हा घडल्यानंतर तपास करताना भलत्याच लोकांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारी मानसिकता असणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात असणारे आणि गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत.

अनेकांना लागली भाईगिरीची चटक

गेल्या पाच वर्षांत दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची संख्या एक हजार ५२३वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर एकही गुन्हा नसणारे, गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्या ‘उदयोन्मुख’ गुन्हेगारांची संख्या साडेसात हजारांपर्यंत असणाऱ्यांची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

सोशल मीडियावर भाईगिरीचे प्रदर्शन

सध्या सोशल मीडियावर भाईगिरीचे प्रदर्शन करण्याचे पेव फुटले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर हातात शस्त्र घेऊन किंवा धमकीचे रील्स बनवून आपण भाईगिरी करीत असल्याचे मिरवण्याचे प्रकार वाढले आहेत. गुन्हे शाखेकडून अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली. या ‘उदयोन्मुख’ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून पोलिसी भाषेत समज देण्याचे काम सुरू झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नागरिकांना इशारा; करभरणा थकविल्यास १ जुलैपासून थेट जप्ती
शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी या उद्देशाने गुन्हेगारांची यादी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पारंपारिक माहिती संकलनाबरोबरीनेच आता नव्या पद्धतीनेही माहिती अद्ययावत केली जात आहे. शहरात संघटित गुन्हेगारी आणि नागरिकांना त्रास होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटनांना आळा बसावा, म्हणून वरिष्ठांनी यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed