• Sat. Sep 21st, 2024

Nashik News: ‘आवास’चा सावळागोंधळ; काहींना प्रतीक्षा, तर काहींना तीन वर्षांनी अनुदान

Nashik News: ‘आवास’चा सावळागोंधळ; काहींना प्रतीक्षा, तर काहींना तीन वर्षांनी अनुदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारकडून पहिल्या घरासाठी मध्यमवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजना अंमलबजावणीबाबत सावळागोंधळ असल्याचे समोर येत आहे. अनेकांची प्रकरणे मंजूर होऊनही त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही, तर काहींना तीन वर्षे उलटल्यानंतर अनुदान प्राप्त झाल्याची बाब पुढे आली आहे.

सर्वसामान्यांच्या पहिल्या घराच्या खरेदीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. केंद्रीय गृह व शहर निर्माण मंत्रालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी नॅशनल हाउसिंग बँक, गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ, स्टेट बँक आदी नोडल एजन्सींद्वारे करण्यात आली. आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी २ लाख ६७ हजार, मध्यम उत्पन्न गट-१ साठी २ लाख ३५ हजार, तर मध्यम उत्पन्न गट-२ साठी २ लाख ३० हजार रुपये अनुदान लाभार्थी कर्जदारांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. या योजनेची मुदत २०२१ मध्ये संपुष्टात आली होती. तिला मुदतवाढ दिल्याचेही जाहीर झाले होते. मात्र, त्याआधी अर्ज करणाऱ्या व प्रकरण मंजूर झालेल्या अनेकांना तीन वर्षे उलटूनही हे अनुदान मिळू शकलेले नाही. यापैकी काहींनी नोडल एजन्सींसह थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत ई-मेलद्वारे संपर्क साधला असता, त्यांना या योजनेसाठी सन २०२१ नंतर निधीच उपलब्ध न झाल्याचे उत्तर आले आहे. याउलट काहींना मात्र जून २०२१ मध्ये अर्ज करूनही अनुदान मिळाल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.

आम्ही पहिल्या घरासाठी एचडीएफसी बँकेतून १९ लाखांचे कर्ज घेतले होते. पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानासाठीचा आमचा अर्ज जानेवारी २०२१ मध्ये मंजूर झाला होता. मात्र, अद्याप अनुदान मिळालेले नाही. आतापर्यंत पाठपुरावा सुरू आहे.- विनायक रौंदळ, नाशिक

मी डिसेंबर २०२० मध्ये बँक ऑफ इंडियातून कर्ज घेतले होते व पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरून दिला होता. बँकेने ९ मार्च रोजी कागदपत्रे वर पाठवली. मात्र, आतापर्यंत अनुदान मिळू शकले नाही. यासंदर्भात ‘हुडको’कडे विचारणा केली असता, या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर आले आहे.- किरण सानप, नाशिक
नागपुरात बंटी-बबलीचा कारनामा! एका युवकाच्या नावे GSTत तब्बल कोट्यवधीची हेराफेरी उघड

एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून डिसेंबर २०२० मध्ये अर्ज करूनही अनुदान मिळू शकले नाही. त्यासाठी निधी नसल्याचे कारण ‘हुडको’कडून दिले गेले. मात्र, माझ्या परिचितांना जून २०२१ मध्ये प्रकरण मंजूर होऊन जानेवारी २०२३ मध्ये अनुदान मिळाले. मार्च २०२१ नंतर निधी नव्हता, तर हे पैसे कसे आले, हे कळेनासे आहे.- प्रा. स्वप्नील बच्छाव, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed