• Sat. Sep 21st, 2024

पिंक व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलंय…? सावधान! नव्या व्हायरसद्वारे होईल मोबाईल हॅक, अशी घ्या काळजी

पिंक व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलंय…? सावधान! नव्या व्हायरसद्वारे होईल मोबाईल हॅक, अशी घ्या काळजी

तुषार धारकर, नागपूर : स्मार्टफोन वापरणाऱ्यांना दररोज कुठल्या ना कुठल्या सॉफ्टवेअर किवा अॅपला अपडेट करण्याचे नोटीफिकेशन्स येत असतात. बरेचदा मोबाइलधारकांकडून कोणतीही माहिती न घेता हे अपडेट करण्यात येतात. मात्र, बरेचदा यामुळे मोबाइलमधील माहिती दुसरीकडे जाण्याचा धोका असतो. सध्या अशाच ‘पिंक व्हॉटसॲप’ अपडेटने मोबाइलधारकांना अडचणीत आणले आहे.

‘नव्या फीचर्ससह व्हॉट्सअॅप अपडेट करण्यात आला आहे. नवा व्हाट्सअॅप हिरव्या रंगातून पिंक होतो. पिंक व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा…’, अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मात्र हा ‘पिंक व्हॉट्सअॅप’ एकप्रकारचा व्हायरस असून यामुळे हॅकर्स वैयक्तिक माहिती हेरत आहेत. यापासून सावध राहण्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

व्हॉट्सअॅप हा आजघडीला प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कार्यालयीन कामांसह व्यक्तिगत कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. व्हॉट्सअॅपच्या सुरक्षितेबाबत तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी हॅकर्स ही सुरक्षा भेदण्यासाठी नवनव्या गोष्टी आणत असतात. सध्या हॅकर्सतर्फे पिंक व्हॉट्सअॅप हा प्रकार आणला गेला आहे. व्हॉट्सअॅप अपडेट करण्याच्या नावावर वापरकर्त्यांना गंडा घातला जात आहे. विशेषत अँड्राइड फोन असणारे वापरकर्ते याचे अधिक प्रमाणात बळी ठरत आहेत. पिंक व्हॉट्सअॅपच्या धोक्यांबाबत केंद्रीय संचार मंत्रालयानेही सावध असल्याचा इशारा दिला आहे. देशभरातील विविध सायबर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून देखील वापरकर्त्यांना याविषयीची माहिती देऊन सावध केले जात आहे.

अशी होते फसवणूक

‘व्हॉट्सअॅपतर्फे अपडेट आली असून या लिंकवर क्लिक करा’, असा संदेश पाठविला जातो. लिंकवर क्लिक केल्यावर मोबाइल फोनमध्ये गुलाबी रंगाचा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल होतो. या गुलाबी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोबाइलमध्ये व्हायरस सोडला जातो. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरील सर्व संदेशांसह मोबाइलमधील सर्व गोपनीय माहिती हॅकर्सद्वारे हेरली जाते. व्हॉट्सअॅप पेमेंटची सुविधा सुरू झाल्याने आर्थिक फसवणुकीचा धोकादेखील उद्भवतो.

गडचिरोलीतील हत्ती कॅम्पमध्ये तरुणांची बाईक हत्तीनीच्या तावडीत; फुटबॉलसारखं खेळत गाडी थेट जंगलात नेली

बचाव कसा करावा

– जर एखाद्याने पिंक व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केला असेल तर तत्काळ त्याला डिलीट करून फोन रिस्टार्ट करा आणि अपडेट करा
– व्हॉट्सअॅप किंवा इतर अॅप अपडेट करण्यासाठी नेहमी गूगल प्लेस्टोअरसारख्या अधिकृत अॅप्सचा वापर करा
– अनोळखी लिंक्सवरून आलेल्या कुठल्याही गोष्टींवर कधीही क्लिक करू नका. असे काही आल्यास त्याला तत्काळ डिलीट करण्यासह ब्लॉक करा
– सायबर गुन्हा घडल्यास त्याची तक्रार १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed