शाळांच्या आवारात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. परंतु, आजही अनेक शाळांमध्ये अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सहजपणे विद्यार्थ्यांसमोर सेवन करतात. काहीवेळी तर ग्रामीण, दुर्गम भागांसह शहरातही मद्य प्राशन करून शिक्षक शाळेत येतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या प्रकाराला लगाम घालण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला आहे. शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकाच्या परिविक्षाधीन कालावधीत त्याच्या सेवेचे व वर्तनाचेही मूल्यमापन करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त स्तरावर ही समिती काम करणार आहे. मूल्यमापन चाचणीचे स्वरूप व इतर आवश्यक नियमावली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शिक्षण आयुक्तांना निश्चित करावी लागणार आहे.
आचारसंहिताभंग निष्पन्न झाल्यास…
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निर्धारित आचारसंहितेचा शिक्षकाने भंग केल्याचे निष्पन्न झाल्यास आधी त्याला नोटीस बजावण्यात येणार आहे. सुधारणा न आढळल्यास सहा महिन्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. त्यानंतरही वर्तणूक न सुधारल्यास सहा महिन्यांसाठी ५० टक्के वेतनावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. त्यानंतरही बदल न झाल्यास संबंधित शिक्षकावर जिल्हा परिषद, जिल्हा सेवा नियम १९६७ नुसार सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत कारवाई केली जाणार आहे.