एमआयडीसीकडून कंपन्यातील सांडपाणी बंदिस्त नाल्याद्वारे प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेत या पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर ते सांडपाणी पुन्हा बंदिस्त नाल्याद्वारे खोल खाडीत सोडण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र कंपन्यापासून सांडपाणी प्रकल्पापर्यंत हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात ठिकठिकाणी डेब्रिजच्या गोणी, प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली बारदाने, प्लास्टिकचा कचरा टाकला जात असल्याने हे नाले तुंबतात. या नाल्याची सफाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र यंदा एमआयडीसीकडून ही नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच टाटा पॉवरकडून खंबाळपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या नाल्यातील सांडपाणी चेम्बर्समधून रस्त्यावरून वाहत आहे.
लाल रंगाच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे एमआयडीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी डोंबिवलीत झालेला हिरवा पाउस, गुलाबी रस्ता, हिरवा नाला यामुळे डोंबिवली शहराला प्रदुषणाचा विळखा असल्याचे उघड झाले आहे. आता हे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने शहराची प्रदुषणातून मुक्तता करण्यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मलनिस्सारण केंद्राचे सांडपाणी रस्त्यावर
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अंबरनाथ – बदलापूर महामार्गावर पालिकेच्या भुयारी गटाराच्या झाकणातून थेट मलनिस्सारण बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे यास रस्त्यावर सर्वत्रच सांडपाणी आणि दुर्गंधी पसरली होती.
अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे संथ गतीने वाहतूक सुरू होती. वडवली नाक्यावर भुयारी गटाच्या लाइनमधून थेट सांडपाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. नेमकं हे सांडपाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं आलं? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.