हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यांना अतिमुसळधार पासवाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ९ जिल्ह्यांना काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर, मुंबई, ठाणे, पालघरसह ६ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि रायगडला पुढील तीन दिवस, ठाणे आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस तर मुंबई आणि सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती आहे.
पाहिल्याच पावसाचा कहर; भिवंडीतील बहुतांश सखल भाग जलमय
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळ पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट,बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले.येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. पावसाने भिवंडी महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.
३५ फूट उंच पिंपळाचे झाड कोसळून मालाड येथे ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी चाळीतील शौचालयात गेला होता. यावेळी हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.
