• Mon. Nov 25th, 2024
    मोखाड्यात पाऊस लांबल्याने लावणीच्या हंगामात पेरणी; यंदा एक महिना उशिराने पीक येणार हाती

    म. ट वृत्तसेवा, जव्हार : जव्हार, मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी ७ जूनच्या दरम्यान पावसाचे आगमन होते. त्यापूर्वी शेतकरी रोहिणी आणि मृग नक्षत्रात हळव्या पिकाच्या, धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरुवात करतात. त्यानंतर आद्रा नक्षत्रात म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदर मोखाड्यात लावणीला सुरुवात होत असते. यंदा पावसाअभावी दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे भाताची पेरणी रखडली. त्याचा धूळ वाफेवरच्या पेरणीलाही फटका बसला. आता आद्रा नक्षत्रात म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदर पावसाने हजेरी लावल्याने, दरवर्षीच्या लावणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदा खरीपाचे पीक महिनाभर उशिराने शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे.मोखाड्यात केवळ खरिपाचेच पीक घेतले जाते. तालुक्यात कुठलीही औद्योगिक वसाहत अथवा कारखानदारी नाही. खरीप शेती व्यतिरिक्त अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. ही शेतीदेखील संपूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीस उपयुक्त पाऊस पडल्यास येथे भरघोस पीक येते. पावसाने पाठ फिरवल्यास अथवा पावसाच्या लहरीपणामुळे येथील शेतीला मोठा फटका बसतो. त्याचा प्रत्यय या वर्षी खरिपाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आला आहे.

    Palghar News : पालघरमध्ये २७ इमारती धोक्यात ; पालिकेने दिल्या इमारती रिक्त करण्याच्या नोटिसा, जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या इमारती..
    शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस रोहिणी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रात हळव्या पिकाची, धूळ वाफेवरची पेरणी केली. मात्र दरम्यानच्या काळात पाऊस झालाच नाही. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने काही ठिकाणी रोपे जळून गेली तर काही भागांत बियाणे रुजलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे निमगरवे आणि गरवे भात पिकाची पेरणी झालीच नाही. तालुक्यात नागली, वरई आणि भात हे मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सर्वांत जास्त क्षेत्र याच पीकांचे आहे. धूळ वाफेवरच्या पेरणीची रोपे साधारणतः २१ दिवसांत लावणीस योग्य होतात.

    पाऊस न झाल्याने दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. पावसाला आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली आहे. या काळात प्रतिवर्षी हळव्या पिकाची लावणी अर्धिअधिक होत असते. याच काळात काही शेतकरी हळव्या पिकाची लावणी आटोपून, आषाढी एकादशीला पंढरपूरला विठु माऊलीच्या दर्शनाला जातात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने पेरणी रखडली. आता शेतकऱ्यांना लावणीच्या काळात भातपिकाच्या पेरणीला सुरुवात करावी लागली आहे.
    प्रदूषित ओहोळ चढणीच्या माशांच्या मुळावर, अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती
    त्यामुळे ११० ते १२० दिवसांनी येणारे भातपीक यंदा एक महिना उशिरा म्हणजे नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यातही येथील शेती संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्यास अथवा अतिवृष्टीमुळे पिकावर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे शेतीतून शाश्वत भरघोस उत्पन्न मिळेल, याची शेतकऱ्यांनाही शाश्वती राहिलेली नाही.

    यंदा पाऊस उशिरा आल्याने धूळ वाफेवरची पेरणी संकटात आली. भाताची पेरणी खोळंबली. या दिवसांत आम्ही हळव्या पिकाची लावणी अर्धी आटोपतो. मात्र, आता लावणीच्या हंगामात आम्हाला पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदा पीकही महिनाभराने उशिरा हातात येणार आहे. त्यातच शेतीसाठी योग्य आणि वेळेत पाऊस झाला तरच या पिकाची आशा आहे.

    – सुरेश गवळ, शेतकरी, वनवासी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed