दोन्ही बाजूला दरवाजे असावेत, यासाठी अशा बसमधील प्रवाशांसाठी आसनव्यवस्था कमी करण्यात आली होती.
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे कारण सांगत पुणे महापालिकेने नगर रस्त्यावरील येरवडा-रामवाडी दरम्यान तीन किलोमीटर मार्गावरील बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. ही बीआरटी काढताना पीएमपीला कोणतीही कल्पना दिली नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीचे आठ मार्ग आहेत. या मार्गांतून दिवसाला साधारण साडेसातशे ते आठशे बस धावतात. त्यापैकी पावणेचारशे बस पुण्यात असलेल्या तीन बीआरटी मार्गांतून धावतात. चारशे बस पिंपरी-चिंचवड परिसरातील चार मार्गांतून धावतात. आता पुण्यातील बीआरटीचा फक्त स्वारगेट ते कात्रज हा मार्गच सुरू आहे. नगर रस्त्यावरील तीन किलोमीटरचा बीआरटी मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गावरील अर्धा मार्ग पूर्वीच काढण्यात आला आहे.
पीएमपीकडे एकूण २०८९ बस असून, त्यापैकी बीआरटी मार्गासाठी १४०० बस आहेत. या बसचे दरवाजे बीआरटी मार्गाप्रमाणे बनविण्यात आले. परंतु, आता हे मार्गच बंद झाल्याने पीएमपीकडे असलेल्या १४०० बस नियमित रस्त्यावर चालवाव्या लागणार आहेत. या १४०० बसचे आयुर्मान सहा वर्षे आहे; तसेच नव्याने १९२ ई-बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यादेखील बीआरटी मार्गासाठीच येणार आहेत. एकीकडे बीआरटी मार्ग कमी केले जात असताना नवीन येणाऱ्या बसदेखील बीआरटी मार्गासाठी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना पीएमपीला भविष्यात नक्कीच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा आहे.
प्रवासाचा वेळ आठ ते दहा मिनिटांनी वाढणार
नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यान असलेली बीआरटी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बीआरटी काढल्यानंतर याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होणार आहे. सध्या नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गातून दिवसाला १५७ बसच्या १६३४ फेऱ्या होत होत्या. यामधून ९० हजार ते एक लाख प्रवासी करीत आहेत. या प्रवासांचा साधारण आठ ते दहा मिनिटे वेळ वाचत होता. पण, बीआरटी मार्ग काढल्यानंतर बसच्या फेऱ्यांबरोबरच प्रवाशांचा प्रवासातील वेळ आठ ते दहा मिनिटांनी वाढणार आहे.