म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या हंगामातील पहिला जोरदार पाऊस ऐन सुट्टीच्या दिवशी रविवारी बरसल्याने उत्साही पुणेकरांच्या गाड्या सकाळीच सिंहगडाकडे वळाल्या. त्यामुळे जून महिन्यातील सर्वाधिक गर्दी गडावर दिसून आली. रविवारी दिवसभरात बारा हजारांहून अधिक पर्यटकांनी सिंहगडावर हजेरी लावली. पावसाळी पर्यटनाची नांदी झाल्याने वन विभागाने पुढील चार महिने सुट्टीच्या दिवशी बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.पावसाळी पर्यटनासाठी पुणेकरांसाठी सिंहगड हे वर्षानुवर्षे आणि हक्काचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता ओसरली की पर्यटकांचे गडावर जाण्याचे नियोजन सुरू होते. गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या वाढत असून, पर्यटनासाठी आणि भटकंतीसाठीही गाडी घेऊन जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने शनिवारी आणि रविवार दोन्ही दिवस गडावर गर्दी झाली होती. कॉलेजमधील मित्रांबरोबरच, सहकुटुंब भटकंतीला आलेल्यांची संख्याही मोठी होती. सिंहगड आणि लगतच्या डोंगररांगावर धुक्याची झालर पसरल्याने पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. मनसोक्त भटकंती केल्यानंतर आल्हाददायक वातावरणात पिठलं-भाकरी आणि गरमागरम कांदाभजीचा आस्वादही घेतला.
दाम्पत्याच्या वादात मध्यस्थी भोवली, वर्ध्यात वृद्धाला बसमधून खाली उतरवलं, आठ-दहा जणांची मारहाण
पर्यटकांची गर्दी वाढणार, याचा अंदाज आल्याने वन विभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडावरील बंदोबस्त वाढवला होता. गडावरील पार्किंगची मर्यादा संपल्यावर वन कर्मचाऱ्यांनी पायथ्याला गाड्या रोखून धरण्याची सूचना दिली. जेवढ्या गाड्या खाली जातील, तेवढ्याच वर पाठविण्यात आल्या. त्यामुळे वेळी घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.अडीच हजार दुचाकींची नोंद
सिंहगडावर सायंकाळी सहापर्यंत १६६९ दुचाकी आणि ६६४ चारचाकी गाड्यांची नोंद झाली. अनेक पर्यटकांनी स्थानिकांच्या व्यावसायिक चारचाकी गाड्यांचा पर्याय निवडला. पहाटे साडेपाचपासून पायवाटेने गड चढणाऱ्यांची वर्दळही रविवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत गड पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत गडावर दोन हजार ४३३ दुचाकी आणि एक हजार १२७ चारचाकी खासगी गाड्यांची नोंद झाली. सिंहगडाबरोबरच नागरिकांनी पानशेत, खडकवासला चौपाटीवरही गर्दी केली होती.