गडचिरोली: महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये एका हत्तीनीने दुचाकीसोबत फुटबॉल खेळल्याचा प्रकार २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. यात दुचाकीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये एकूण आठ हत्तींचा समावेश असून यातील ‘मंगला’ नावाच्या हत्तींनीने हा प्रकार केला.
प्राप्त माहितीनुसार, छल्लेवाडा येथील दोन युवक २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास येथून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या दामरंचा या गावाकडे दुचाकी घेऊन निघाले होते. कमलापूर ते दामरच्या रस्त्यावर मोठ्या तलाव परिसरात वन विभागाचा शासकीय हत्तीकॅम्प आहे. या परिसरात पोहोचताच एका युवकाला शौचास लागल्याने दुचाकी उभी करून बाजूला गेले होते. त्यादरम्यान मंगला नावाच्या हत्तींनीने सदर दुचाकीला खाली पाडत येथील मुख्य रस्त्यापर्यंत चक्क फुटबॉल खेळला. हा प्रकार या दोन युवकांच्या डोळ्यासमोर घडला.
मात्र, हत्तींनीचे रैद्ररुप बघून त्यांना व्हिडीओ काढण्यापलीकडे काहीही करता आले नाही. त्या दोन युवकांच्या डोळ्यादेखील हा प्रकार घडला. त्यात दुचाकी चकनाचूर झाली आहे. मुख्य रस्त्यावरही बराच वेळ हा प्रकार सुरू होता. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी आपली वाहने थांबवून दुरूनच हा प्रकार बघत होते. यात दुचाकीस्वाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या मोसममध्ये येथील ‘अजित’ नावाचा हत्ती दरवर्षी खुंकार रौद्ररूप धारण करत असल्याने त्याला बांधून ठेवतात.
सध्या मागील आठ दिवसांपासून त्याला बांधूनच ठेवले आहे. मात्र,’मंगला’ हत्तींनीने अस पहिल्यांदाच केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या पावसाळ्यात येथील तलाव तुडुंब भरतो. निसर्गरम्य वातावरणात हत्तींना बघायला तसेच परिसरातील धबधबे ओसंडून वाहत असल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. मात्र सदर घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हत्तींना सोडल्यावर ये-जा करणाऱ्यांमध्ये भीती येथील हत्तींची देखभाल करणारे महावत आणि चाराकटर सकाळी जेवण झाल्यावर हत्तीकॅम्प परिसरात येणाऱ्या पर्यटकांना माहिती देऊन त्यांना फोटो सेशन साठी सहकार्य करतात.
सायंकाळच्या सुमारास परत हत्तींना जंगलात सोडतात. कर्मचारी उपस्थित नसताना कोणीही हत्ती जवळ जाऊ नये. परिसरात वावरू नये असे आवाहन नेहमीच वन विभागातर्फे करण्यात येते. मात्र मुख्य रस्त्याला लागूनच हत्तीकॅम्प असल्याने अशावेळी सायंकाळी किंव्हा रात्रीच्या दरम्यान ये-जा करणार्यांना हत्ती रस्ता ओलांडताना प्रतीक्षा करावे लागते. शिवाय अशा घटना घडल्यास ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. सदर घटनेची माहिती मिळाली असून वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा करण्यासाठी सांगितलं आहे. कुठल्या हेड मधून नुकसान भरपाई देता येईल याबाबत सविस्तर माहिती घेऊन विचार करणार, विकास भोयर,वनपरिक्षेत्र अधिकारी,कमलापूर