• Thu. Mar 12th, 2026
    VIDEO: मुंबईत मोठी दुर्घटना; मिरवणूक सुरू असतानाच इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू

    मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील नानावटी रुग्णालयाच्या शेजारी असणाऱ्या एका रस्त्यावरून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक जात होती. सर्वजण आनंदात असतानाच अचानक एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. यामध्ये इमारतीच्या खाली उभ्या असलेले रॉबिन मिस्किटा आणि प्रशिला मिस्किटा हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून या दाम्पत्याला मृत घोषित केले.

    दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, रुग्णवाहिका, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीखालून बरेच जण जात होते. मात्र ही गर्दी पुढे सरकल्याने अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले.

    दरम्यान, मुंबईत कालपासूनच मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने विले पार्ले परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *