या घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन आरोपींविरुद्ध खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली . पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. नमुद आदेशाप्रमाणे दोन पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकास रवाना करण्यात आले होते. हे पथक अहमदनगर शहर व परिसरात फिरुन आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी गणेश हुच्चे हा आणि त्याचे इतर साथीदार मोटार सायकलवर शनिशिंगणापुर येथे गेले आहेत.
खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने शनिशिंगणापुर येथे जात शोध घेतला असता आरोपी हे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करुन प्रवरासंगम येथे गेल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, त्याठिकाणीही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. सदर आरोपी हे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पनवेल व मुंबई सेंट्रल असा सार्वजनिक वाहतूक व खाजगी वाहनांनी प्रवास करुन वारंवार जागा बदलत होते. स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक मुंबई सेंट्रल येथे आरोपींचा शोध घेत असताना याच दरम्यान पथकास आरोपी हे रेल्वेने मुंबई सेंट्रल ते पुणे असा प्रवास करुन हैदराबाद येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी लागलीच दुसरे एक पथक पुणे येथे पाठवुन रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात हैदराबाद येथे जाणारी गाडी उशिराने येणार असल्याने दोन्ही आरोपी रेल्वे स्टेशन परिसरात फिरताना आढळले . यानंतर पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडे तिसरा साथीदार संदीप गुडा याच्याबाबत विचारणा केली असता आपआपसात वाद झाल्याने तो छत्रपती संभाजीनगर येथुन निघुन गेल्याची माहिती दिली. तो अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.