अवधूत गुप्ते याचा खुपते तिथे गुप्ते हा मुलाखतींचा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आलाय. तिसऱ्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी हजेरी लावली होती. आता येत्या भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांची मुलाखत पाहायला मिळणार आहे.
या मुलाखतीत अवधूतनं संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड माहिती होतं का? असा प्रश्न विचारला. यावर राऊत यांनी हो आम्हाला माहीत होतं, असं म्हटलंय. शिवसेनेत आमदारांची गळती सुरू होती. सामान्य माणूस फक्त बघत होता. तुमची काय परिस्थिती होती? तुम्हाला माहीत होतं का? असा प्रश्न अवधूतनं विचारला.
संजय राऊत म्हणाले की, ….
आम्हाला माहीत होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडं फक्त सात ते आठ आमदार होते. बाकीचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी फोडले, असा गौप्यस्फोटही राऊतांनी यावेळी केलाय.
बाळासाहेबांना केला कॉल
खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये एक खास राऊंड असतो. यात आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला कॉल करायचा असतो, प्रत्यक्षात बोलता येणं शक्य नाही, अशा व्यक्तींपर्यंत त्यांच्या भावना पोहोचाव्या, असा या राऊंडचा उद्देश आहे. शोमध्ये संजय राऊत यांना विचारण्यात आलं की, तुम्ही कोणाला कॉल करणार? तेव्हा राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं. यानंतर संजय राऊत यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंना फोन केला. या फोनवर त्यांनी बाळासाहेबांकडं काही तक्रारी केल्या आणि काही आश्वासनंही दिल्याचं या प्रोमोच्या व्हिडिओत पाहायला मिळालं.