‘शिक्षण आणि कौशल्य विकासात केलेली गुंतवणूक मानवतेच्या प्रगतीसाठी उपकारक आहे. ज्ञान, कौशल्ये; तसेच सामाजिक-आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी, आयुष्यभर शिकण्याच्या संधींद्वारे जगाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-२० सदस्य आणि आमंत्रित देश एकत्र आले आहेत. उत्तम प्रशासन, मानवतेचे कल्याण, दर्जेदार शिक्षण संकल्पनेला उद्देशून काम करायचे आहे. शिक्षणाने देशांच्या सीमा ओलांडल्या पाहिजेत. जगातील सर्व मुले आणि तरुणांना सर्वांगीण शिक्षणाचा फायदा होईल; तसेच तरुण पिढी २१ व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज असेल, हे निश्चित केले पाहिजे,’ असेही प्रधान यांनी सांगितले.
पाच भूमिकांवर एकमत
– जागतिक स्तरावर प्रतिष्ठेसाठी आणि सक्षमीकरणासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
– शिक्षणाद्वारे लवचिक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करण्याच्या गरजेवर सहमती.
– वय, लिंग, सामाजिक-आर्थिक, शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी विचारात न घेता प्रत्येकाला दर्जेदार, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण आणि प्रशिक्षण मिळावे.
– शिक्षणात तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे. आजीवन शिक्षणाच्या गरजेवरही एकमत.
– डिजिटल परिवर्तन, महिला-नेतृत्त्व विकास, हरित संक्रमण, शाश्वत विकासासाठी शिक्षण आणि जीवनशैलीची महत्त्वाची भूमिका.
चार प्राधान्यक्रम निश्चित
– ब्लेंडेड शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता निश्चित करणे.
– प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञानाने शिक्षणाला सक्षम, अधिक समावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनवणे.
– कामाच्या भविष्यासंदर्भात क्षमता निर्माण करणे, आयुष्यभर शिकण्यास प्रोत्साहन देणे.
– शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये समृद्ध सहकार्याद्वारे संशोधनाला बळकटी देणे. नवकल्पनांना प्रोत्साहन देणे
पुढील वर्षीच्या ‘जी २०’साठी तीन महत्त्वाच्या विषयांवर प्रस्ताव मांडण्यात येत आहेत. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर द्यायला हवा. त्यासाठी सर्व ‘जी-२०’ देशांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे माहितीच्या आदानप्रदानासाठी यंत्रणा विकसित करणे आणि शाळांसाठी सामुदायिक सहभाग, अशा मुद्द्यांवर भर देण्याची गरज आहे.
– कॅमिलो संताना, शिक्षणमंत्री, ब्राझील