• Mon. Nov 25th, 2024

    हरीनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 23, 2023
    हरीनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन – महासंवाद

    पंढरपूर दि. २३ (उ.मा.का.) :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

    धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी  पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

     पालकमंत्र्यांनी केले सारथ्य

    धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.  पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटला

    सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप

    सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे  आगमन सकाळी 10.40 वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र  डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

    हरीनामात वारकरी तल्लीन

    टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी,

    वाट ती चालावी पंढरीची

    या संत वचनानुसार  टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते.  प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.

    वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

    पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे.

    धर्मपुरी येथे पालखी अगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.

    मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

    धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

    पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व  स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने उभारलेल्या तात्पुरत्या अतिदक्षता कक्षास  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.

    दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर  माऊलींची पालखी पाटबंधारे  विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

    नातेपुते येथे पालखीचा मुक्काम

    धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गस्थ झाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed