या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.ज्या दिवशी दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे दोघे दुचाकीवरुन राजगडावर गेले, तेव्हाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. यात राहुल हांडोरे आणि दर्शना पवार दिसत आहेत. यावरुन हत्येच्या दिवशी राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे एकत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुलने पोलिसांना यापूर्वीच हत्येची कबुली दिल्याचे समजते. दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हा वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. पोलिसांनी त्याला मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. तो रेल्वेने दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे.
दर्शना आणि राहूल एकमेकांना लहान पणापासून ओळखत होते. दोघेही पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करीत होते. दर्शना हुशार असल्याने ती MPSC परीक्षा उत्तीर्ण झाली. यानंतर ती वनाधिकरी म्हणून काही दिवसांतच कामावर रुजू होणार होती. तर राहुल हंडोरे याला परीक्षेत अपयश येत होते. तो डिलिव्हरी बॉयचे पार्ट टाईम काम करायचा आणि इतर वेळी तो एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता.
दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. १२ जूनला दोघेही राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून आले होते. असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. मात्र काही वेळानंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पहायला मिळत आहे. तिचे लग्न ठरले होते की नव्हते, तसेच सीसीटिव्ही बाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दर्शनाने दिलेला नकार हा राहुलच्या जिव्हारी लागला आणि गोड बोलून राहुलने तिला ट्रेकिंगला जाण्याच्या बहाण्याने राजगडावर नेले आणि तिचा घात केला, अशी माहिती समोर आली आहे.
राहुल हंडोरेला तीन महिन्यांत फासावर लटकवा: तृप्ती देसाई
दर्शना पवारच्या मारेकरी असलेल्या राहुल हंडोरेला तीन महिन्याच्या आत फासावर लटकवा. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा आणि विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करा, अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.