राहुल हंडोरे याच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याला पुण्यात आणले. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपशील माध्यमांसमोर मांडला. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस राहुल हंडोरे यालाही सोबत घेऊन आले होते. गेल्या चार दिवसांपासून दर्शन पवार हत्याप्रकरण आणि राहुल हंडोरे हे नाव प्रचंड चर्चेत होते. त्यामुळे राहुल हंडोरे नेमका कोण आहे, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तोंडावर काळा कपडा घातलेल्या राहुल हंडोरेला पत्रकार परिषदेत सर्वांसमोर आणले. त्यानंतर पोलिसांच्या टेबलाच्या खालच्या बाजूला राहुल हंडोरेला बसवून ठेवण्यात आले होते. राहुल हंडोरेला समोर बसवूनच पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेकांच्या नजरा खालच्या बाजूला मान खाली घालून बसलेल्या मरुन रंगाच्या टी-शर्टमधील राहुल हंडोरे याच्यावर खिळलेल्या होत्या.
राहुल हंडोरे पोलिसांच्या तावडीत सापडायला इतका वेळ का लागला?
दर्शना पवारची हत्या केल्यानंतर राहुल हंडोरे याने तिथून पळ काढला होता. राहुल हंडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून पोलिसांची पाच पथकं राहुलचा शोध घेत होती. दर्शनाला मारल्यानंतर राहुल हंडोरे पश्चिम बंगालला गेला. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा असा त्याचा प्रवास सुरु होता. सातत्याने फिरत असल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस त्याचे लोकेशन वारंवार तपासत होते. अखेर पश्चिम बंगालवरून मुंबईत येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंधेरी रेल्वे स्थानकावर पुणे ग्रामीण पोलिसानी राहुल हंडोरेला अटक केली.