पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील वेतवडे या गावात महादेव दादु पाटील (वय-७५ ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील ( वय-७० ) राहतात. या वृद्ध दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीत दिवसभर शेतात ते राबत असत.
या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून सर्व गावकरी आदराने आणि लाडाने त्यांची गरीब व स्वाभिमानी जोडपे अशी प्रशंसा करत. सर्व गावकरी दोघांना आदराने आण्णा, द्वारकाआई असं म्हणत असत. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार होता.
वयाची सत्तरी गाठल्याने वृद्ध दाम्पत्याला आजारानेही ग्रासले होते. या आजाराला कंटाळून त्यांनी खडतर जीवनाची वाटचाल आता नको वाटू लागली. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याने जगाचा निरोप घ्यायचे ठरवले.
दोघांनी आपण मयत झाल्यानंतर दुसऱ्यांना त्रास नको म्हणून अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या आदल्या दिवशी सायंकाळी जागा केली. अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेवली. त्याच ठिकाणी पाण्याची घागर भरुन ठेवली. गवत गोळा करुन ठेवलं, मयताचे साहित्य इत्यादी कामे स्वतःच करुन ठेवली.
मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास लावून दोघांनी आत्महत्या केली. ही घटना मुलगा आकाराम महादेव पाटील यांना समजली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या गरीब वृद्ध दाम्पत्याच्या अशा प्रकारच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.