या घटनेमुळे भयग्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि चंद्रकांत खांडवी यांची भेट घेत गुन्हेगारांचा बीमोड करण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांची ‘वरात’ काढून चांगलाच वचक निर्माण केला. त्यानंतर सर्व आस्थापनांच्या बैठका घेत आस्थापनांनीही पोलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आस्थापनांनी आता सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करून पोलिसांना सहकार्य करीत प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे संकल्पना?
प्रत्येक आस्थापनेमध्ये स्वत:च्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवरील घटना दिसतील या स्वरूपाचे सीसीटीव्ही बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ‘एक कॅमेरा नाशिकसाठी’ अशी संकल्पना मांडली. त्यातून रस्त्यावरील घटना दिसतील, या स्वरूपाचे सीसीटीव्ही आता बऱ्यापैकी आस्थापनांनी तैनात केले आहेत. त्यातील फूटेजद्वारे ‘स्ट्रीट क्राइम’सह इतर गंभीर गुन्ह्यांतील संशयित शोधण्यासाठी पोलिसांना फायदा होत आहे. बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांची यादी करून त्यांच्याशी संवाद वाढविण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे.
शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आस्थापनांनी एक कॅमेरा शहरासाठी लावला आहे. त्या अन्वये प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दीडशे आस्थापनांनी कॅमेरे बसविल्याने १,९५० सीसीटीव्हींचा वापर शहरासाठी करण्यात येत आहे. -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त