विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श आणि मुखदर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आज ११ वाजता विठ्ठल रखुमाईचा पलंग काढण्यात आला. पलंग काढल्यानांतर आषाढी वारी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.
इतर दिवशी विठुरायाची सकाळी ४ वाजल्यापासून पूजाअर्चना होत असते यानंतर रात्री ११:३० वाजता शेजारती होते. साडे अकरानंतर मंदिर भाविकांसाठी बंद राहते. मात्र, देवाचा पलंग काढल्यामुळे नित्याच्या पूजाअर्चना बंद राहणार आहेत. या वेळेचा भाविकांना उपभोग घेता यावा यासाठी मंदिर प्रशासनाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या, ज्ञानोबांची पालखी तरडगावकडे प्रस्थान करणार आहे. चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडेल. तर, तुकोबांची पालखी सणसरमधून आंथुर्णेकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी बेलवाडीत अश्वाचे पहिले गोल रिंगण पार पडले.