दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद
लातूर पॅटर्न त्यातल्या त्यात सीबीएससीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून संत तुकाराम विद्यालयाकडे पाहिलं जातं. शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या या विद्यालयात विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय अन् विनम्रतेचेही धडे दिले जातात. असं असताना २५ एप्रिल रोजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र, हा वाद तिथेच मिटण्याएवजी इतका विकोपाला गेला की या विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि विनयशिलतापूर्ण शिस्तप्रियतेची इभ्रत निघाली. ही बाब शाळा प्रशासनाच्या वर्मी लागली. त्यामुळे शाळा प्रशासनाला दोषी आढळून आलेल्या १४ विद्यार्थ्याना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालकांची शाळेला विनंती, पण शाळेचा स्पष्ट नकार
ही, बाब पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. सर्व प्रकार जाणून घेतला. परंतु, आपला पाल्य हाणामारीपर्यंत मजल मारत, भांडणं करणार नाही असा विश्वास त्यांना वाटू लागला. त्यांनी शाळा प्रशासनाला आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण शाळा प्रशासनाने स्पष्ट नकार दिला.
पालकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव…
आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्षात या शाळेने आपल्या पाल्याला काढून टाकले तर…? पाल्याचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून पालक चिंताग्रस्त झाले. अखेर या पालकांनी जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील दोन आमदार, शिक्षण मंत्री अन् थेट उप मुख्यमंत्री यांच्यापर्यंत धाव घेत मध्यस्थी करण्याची मागणी गेली. राज्याचे उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री २ आमदार जिल्हाअधिकारी या सर्वांनी शाळा प्रशासनाची चर्चाही केली. मात्र, शाळा प्रशासनान अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहे.
शाळेने अद्याप सीसीटीव्ही फुटेज दाखवले नाही…
दरम्यान, ठीक आहे विद्यार्थ्यानी हाणामारी केली असेलही पण यात नेमके कोण दोषी आहेत असा प्रश्न पालकांनी केला आहे. आम्हाला किमान ‘ त्या ‘ घटनेचे सीसीटिव्ही फुटेज दाखविण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. जर आमचे पाल्य दोषी आढळून आले तर आम्ही शाळा सोडायला तयार आहोत अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. मात्र, त्यांना अद्याप सीसीटिव्ही फुटेज दाखविण्यात आलेले नाही.
या सर्व पार्शवभूमीवर शाळा प्रशासनान आपल्या निर्णयावर ठाम राहत ‘त्या ‘ कथीत हाणामारी प्रकरणातील दोषी १४ विद्यार्थ्यांना शाळे बाहेरचा रस्ता दाखविणार का? शिक्षण विभाग शाळेवर काही कारवाई करणार का? असे प्रश्न अद्याप निरूत्तरीत आहेत.