लहानपणापासूनच आपल्या कुटुंबीयांचा आणि समाजबांधवांचा जगण्याचा संघर्ष पाहिलेल्या सौरभने सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग घेत परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. सौरभ यांनी मेंढपाळ पुत्र आर्मी नावाची मेंढपाळ तरुणांसाठी राज्यातील पहिली संघटना काढली आणि समाजाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली. मेंढपाळ चराई अधिकार हक्कांसाठी आरोळी मोर्चा, मेंढपाळ टपाल सत्याग्रह, हिवाळी अधिवेशन मोर्चासारखे अभिनव आंदोलन त्यांनी आतापर्यंत केली आहेत. मेंढपाळ टपाल सत्याग्रहाच्या माध्यमातून सौरभ यांनी तब्बल १२००० पेक्षा जास्त पत्रे चराऊ कुरणांच्या अधिकारांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत. हिवाळी अधिवेशनात १९ डिसेंबर रोजी मेंढपाळ लोकांचा चराऊ कुरणांच्या अधिकारासाठी भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता.
सध्या सौरभ हटकर या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या स्कॉलरशिपच्या प्रतीक्षेत असून, त्यांना राज्य शासनाच्या मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या स्कॉलरशिपची प्रतीक्षा आहे. हटकर यांनी मागील सहा वर्षांपासून केलेला आंदोलनामध्ये भटक्या मेंढपाळ समुहासाठी स्वतंत्र स्कॉलरशिप, फेलोशिप असायला हवी अशी मागणी केली
होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय झाला नाही. शासनाने अशी तरतूद केली असती तर आज इतर स्कॉलरशिपसाठी संघर्ष करायची वेळ आली नसती असे सौरभ हटकर यांनी सांगितले.
धनगर समाज भूषण पुरस्कार २०१७चा मानकरी ठरलेल्या सौरभचे यश उपेक्षित समूहाचे आत्मभान उंचवणारे असून, मेंढपाळ आणि भटक्या समूहातील तरुण- तरुणींना उच्च शिक्षणासाठी निश्चितच प्रेरित करणारे ठरेल . सौरभने आपले यश भटक्या आणि मेंढपाळ समूहाला अर्पित करीत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.