मार्मिकमधील लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती गोळा होत होते. वारंवार त्यांना भेटून आपली गाऱ्हाणी मांडत होते. बाळासाहेबही त्यांना मार्गदर्शन करत होते. या काळात मार्मिकचे कार्यालय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे मराठी माणसांचा ओघ वाढत होता. वाचा आणि थंड बसा, हे बाळासाहेबांचं सदर प्रचंड गाजलं. यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना वारंवार पक्षाबाबत, संघटनेबाबत काही विचार डोक्यात आहे का? असे विचारले. लोक येणार-जाणार असे किती दिवस चालणार..? लोकांच्या आवाजाला एकत्रित संघटित रूप कधी देणार? असे प्रश्न विचारले.
अशी झाली शिवसेनेची स्थापना…!
भेटायला येणाऱ्या लोकांपैकी काही लोक पक्ष स्थापनेचा सल्ला देत असत. परंतु हा सल्ला बाळासाहेबांनी झुगारून लावला. मराठी जनतेचा रेटा आणि प्रबोधनकारांचा सल्ला विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे म्हणाले, लोकांना आपण नक्की एकत्र करूया. परंतु पक्ष काढून नाही तर संघटना काढून… मराठी माणसांची, मराठी हिताची रक्षण करणारी संघटना काढूया. त्यानंतर संघटना काढण्याचं नियोजन झालं. तिला प्रबोधनकारांनी स्वतःहून नाव सुचवलं शिवसेना…. शिवाजीची सेना… प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे या ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेली आदराची भावना अनुभवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते हे पाहून प्रबोधनकारांनी बाळासाहेब ठाकरे निर्माण करू पाहत असलेल्या संघटनेस शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना हे नाव देण्याचे निश्चित केले.
१९६६ या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. त्यांनी संघटना स्थापनेची घोषणा केली तो दिवस होता १९ जून १९६६. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी केवळ अठरा लोक हजर होते. त्यामध्ये ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते. यावेळी नाईक नावाच्या एका कार्यकर्त्यांनी शेजारच्या किराणा मालाच्या दुकानातून नारळ आणला. सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांच्या हस्ते नारळ फोडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा उद्घोष करीत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. मार्मिकमधून संघटनेच्या कार्यकर्त्यांची नोंदणी सुरू झाल्याचे जाहीर केल्यावर मार्मिक कचेरीवर झालेल्या तुडुंब गर्दीत २००० तक्ते तासाभरात संपले आणि महिन्यात वीस हजार सैनिकांची नोंदणी झाली. अल्पावधीतच शिवसेना ही चार अक्षरे मुंबईतील घराघरात पोहोचली.