• Sat. Sep 21st, 2024
Pune News : घरगुती वापराच्या पाइप गॅसची बिले अंदाजे; ग्राहकांची तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पाइपद्वारे पुरविल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसची बिले अंदाजे पाठविली जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. ‘गेल्या वर्षभरापासून आमच्या घरात पाइप गॅस कार्यान्वित आहे. मात्र, या वर्षात एकदाही मीटर रीडिंगसाठी ‘एमएनजीएल’कडून कोणीही आमच्या घरी आले नाही. मग, बिले कशाच्या आधारावर पाठवली जात आहेत,’ असा प्रश्न सुभाषनगर येथील रहिवाशांनी उपस्थित केला.’एमएनजीएल’कडून शहराच्या विविध भागांत पाइप गॅस पुरविला जातो. गॅसच्या वापरानुसार त्याची बिले आकारली जातात. त्यासाठी प्रत्यक धारकाच्या घरी मीटर बसविण्यात आलेले आहेत. मीटर रीडिंगनुसार दर दोन महिन्याला त्याची बिले नागरिकांना पाठविण्यात येतात. मीटर रीडिंग घेण्यासाठी कंपनीने नागरिकांना आवाहन केले असून, ‘रीडिंग’ व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाइन कळविण्यास सांगितले आहे. तर, ज्यांना ऑनलाइन ‘रीडिंग’ पाठविणे शक्य नाही. त्या ठिकाणी एमएनजीएलच्या वतीने प्रत्यक्ष जाऊन रीडिंग घेण्यात येते. मात्र, अनेकांना ऑनलाइन मीटर रीडिंग पाठविणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. विशेषत: कोथरूड, कर्वेनगर, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता परिसर (सिंहगड रस्ता) या परिसरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. अशांची मोठी अडचण होत असल्याचे दिसून येते.

भावासोबत पोहायला गेला, भाचा शेततळ्यात बुडताच मामाने उडी मारली; पण क्षणात होत्याचं नव्हतं…
२४ तासांत साडेतीन हजाराने बिल वाढले

सुभाषनगर येथील रहिवासी राजेंद्र भावे यांना नऊ जूनला एमएनजीएलकडून मेसेजद्वारे बिल पाठविण्यात आले. त्यामध्ये ५९७६ रुपये बिल नमूद होते. तर, भावे यांना १० जूनला एमएनजीएलकडून दुसरा मेसेज पाठविण्यात आला. त्यामध्ये बिल ९४१९ रुपये नमूद होते. त्यामुळे एका दिवसात बिलाच्या रकमेत साडेतीन हजार रुपये वाढ कशी झाली, असा प्रश्न भावे यांनी उपस्थित केला आहे.

मीटरच्या फोटोसाठी वृद्धांची कसरत

‘एमएनजीएल’चा मीटर घरात किचनमध्ये लावण्यात येतो. अनेक ठिकाणी किचन ओट्याजवळ असतो. पण, काही घरांमध्ये हे मीटर उंचीवर लावलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खुर्चीवर चढून मीटरचा फोटो काढावा लागतो. वृद्धांना अशी कसरत करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना पाठविण्यात बिले ही सरासरी बिले असतात. चार-सहा महिन्यांतून त्यांचे मीटर रीडिंग घेतल्यानंतर त्या काळातील बिले आणि मीटर रीडिंग याची पडताळणी करून पुढील बिलात सुधारणा केली जाते.

सध्या बिलाची प्रणाली काय?

– दर दोन महिन्यांनी ‘एमएनजीएल’कडून बिले पाठवली जातात.

– ग्राहकांना मीटर रीडिंगचा फोटो पाठविल्याच्या आधारावर ही बिले तयार होतात.

– मीटर रीडिंगचा फोटो न पाठविणाऱ्यांना अंदाजे, सरासरी बिले पाठविली जातात.

– चार ते सहा महिन्यांनी मीटर रीडिंगसाठी ग्राहकांच्या घरी कर्मचारी पाठवला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed