यावेळी आशिष देशमुख यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला. काँग्रेस आणि गांधी परिवाराला ओबीसीद्रोही ठरवून आशिष देशमुख म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीदरम्यान ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मात्र, राहुल गांधींनी माफी मागितली नाही. त्याच राहुल गांधींना राफेल घोटाळ्याबाबत बेताल वक्तव्य केल्याबद्दल कोर्टाकडून फटकारल्यानंतर राहुल गांधींनी माफी मागितली. मात्र, ओबीसींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागितली नाही. तशी मागणी करताच मला निलंबित करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी तलवार उगारली
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. आशिष देशमुख म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंजीराने नव्हे तर तलवारीने हल्ला केला. त्यामुळेच आगामी निवडणुकीत विदर्भ त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे हे विदर्भात फेसबुकशिवाय दिसले नाहीत. तेव्हाही मी याबाबत आवाज उठवला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्व कामे ठप्प झाली होते, असं देशमुख म्हणाले.
काँग्रेस आता म्हातारा पक्ष
काँग्रेस आता म्हातारा पक्ष झाला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस काही करू शकत नाही.याआधी माझा कल काँग्रेसकडे होता, पण यापुढे मी भाजपसोबतच राहणार आहे, याची खात्री देतो. ते म्हणाले की, मी विदर्भात भाजपचे किमान २०-२५ आमदार जिंकवू शकतो, असं आशिष देशमुख म्हणाले.
२०२४ मध्ये मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही
आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये कोणत्याही पदावर प्रवेश केलेला नसल्याचा दावा करत लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. या निवडणुकांमध्ये मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. विधानसभा आणि लोकसभेसाठी भाजप जो उमेदवार उभा करेल तो निवडण्याचा मी प्रयत्न करेन.