• Mon. Nov 25th, 2024

    आईच्या कुशीतून १० महिन्यांची मुलगी पडली अन् जागीच मृत्यू; डोळ्यासमोर पोटच्या गोळ्याचा मृत्यू

    आईच्या कुशीतून १० महिन्यांची मुलगी पडली अन् जागीच मृत्यू; डोळ्यासमोर पोटच्या गोळ्याचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : मामाच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना झालेल्या अपघातात मातेच्या कुशीतील दहा महिन्यांची बालिका खाली पडल्याने तिचा करुण अंत झाला. ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल वारुंगसे (रा. सोनारी. ता. सिन्नर) असे बालिकेचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता चांदगिरी-शिंदे रस्त्यावरील जाखोरी फाट्यावरील शंकराच्या मंदिराजवळ झाला.

    गायत्री वारुंगसे या आपली मुलगी ज्ञानेश्वरीला बरोबर घेऊन सोनारी येथून शिंदे गावात राहणाऱ्या मामांकडे आलेली होती. शुक्रवारी मामा शुभम बेरड यांच्याबरोबर आई गायत्री आणि ज्ञानेश्वरी असे तिघेजण दुचाकीने चांदगिरी येथे नातेवाइकांना भेटायला गेले होते. तिकडून माघारी येत असताना जाखोरी फाटा येथील शंकराच्या मंदिराजवळ दुसरी दुचाकी रस्त्यात आडवी आली. यावेळी शुभम यांनी अर्जंट ब्रेक दाबल्याने त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या गायत्री यांच्या कुशीतील बालिका ज्ञानेश्वरी रस्त्यावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आई गायत्री आणि मामा शुभम किरकोळ जखमी झाले.

    जबाबदारी नसलेलं शोभेचं पद नको, माझी घुसमट मीच थांबवतो; उद्धव ठाकरेंना पत्र धाडत शिशिर शिंदेंचा जय महाराष्ट्र

    गंभीर जखमी ज्ञानेश्वरीस तत्काळ पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. आंबोरे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अत्यंत शोकाकूल वातावरणात सोनारी गावात ज्ञानेश्वरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, अपघातस्थळ सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने नोंदीची कागदपत्रे सिन्नर एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलिस नाइक संतोष पाटील यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *