स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, सिद्धिविनायक मंदिराच्या किचनच्या चिमणीतून सतत तुपाचा उग्र दर्प येत असतो. या वासाने इमारतीमधील रहिवाशांना मळमळ आणि अस्वस्थ वाटत असे. त्यामुळे रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मंदिर प्रशासन चिमणीची दिशा बदलली आहे. मात्र, वाऱ्याच्या झोताने हा सगळा वास पुन्हा इमारतीमध्ये परत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंदिराच्या छतावर लाडू तयार केले जात असत. त्यानंतर लाडू तयार करण्याचा कारखाना किचनमध्ये हलवण्यात आला. तेव्हापासून स्थानिक रहिवाशांना तुपाचा उग्र दर्प सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडे तक्रार करत आहोत. आम्ही सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांचीही भेट घेतली होती. आम्ही त्यांना किचन दुसरीकडे हलवण्यास सांगितल्याचे येथील एका रहिवाशाने सांगितले.
मात्र, सिद्धिविनायक मंदिरातील काही पदाधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे. आम्ही गेल्या २० वर्षांपासून प्रसादाचे लाडू बनवत आहोत. मग एकाच सोसायटीला याचा त्रास कसा होतो? तरीही आम्ही किचनच्या चिमणीची दिशा बदलली. याशिवाय, आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार किचनमध्ये ठेवण्यात आलेला तुपाचा साठाही इतरत्र हलवला आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. पालिकेच्या जी उत्तर प्रभागातील अधिकाऱ्यांनी ५ जूनला सिद्धिविनायक मंदिराची पाहणी केली होती. त्यावेळी मंदिर प्रशासनाकडे आवश्यक ते ना हरकत परवाने असल्याचे दिसून आले. तसेच मंदिरातील किचनमध्ये आवश्यक त्या अग्निप्रतिबंधक उपाययोजना आहेत. फक्त किचनमध्ये तुपासारख्या ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा होता. हा साठा इतरत्र हलवण्याचे आदेश आम्ही दिल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
