हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळादेखील तापदायक ठरत आहेत. तर आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस तर कुठे हवामान कोरडे?
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल तर नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल.
पावसाची प्रतीक्षा आणखी एक आठवडा?
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र गुरुवारी जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार १६ ते २२ जूनच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये दिसत आहे. मॉडेलनुसार २३ जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्रापासून केरळपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने ही स्थिती अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेला चालना देण्यासाठी साह्यभूत ठरणार आहे, असे हवामान विभागाचे अधिकारी अनुपम काश्यपी यांनी स्पष्ट केले. १८ ते २२ जूनदरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होऊ शकतो; मात्र राज्याच्या उत्तर भागात तसेच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.