छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावातील इयत्ता बारावीत शिकणारी विद्यार्थिनी एमएससीआयटीचे शिक्षण घेण्यासाठी लाडसावंगी येथील एका खाजगी संगणक शिकवण केंद्रामध्ये शिकवणीसाठी जात असे. दरम्यान या मुलीला ने-आण करण्यासाठी तिचा लहान चौदा वर्षीय भाऊ दुचाकीवर येत असे. बहिणीला सोडवल्यानंतर तो त्याच्या खाजगी शिकवण्यासाठी जात होता.
दरम्यान नेहमीप्रमाणे असेच सुरू होते. पुढे १२ जून रोजी लाडसावंगी येथे दोघेही बहीण-भाऊ शिकवणीसाठी आले. भावाने बहिणीला संगणक केंद्रात सोडून तो स्वतःच्या खाजगी शिकवणीसाठी गेला. वर्ग संपल्यानंतर बहिणीला घेण्यासाठी संगणक केंद्रावर आला असता तेथे बहीण आढळून आली नाही. दरम्यान, सर्वत्र शोध घेऊन नातेवाईकांकडे विचारपूस केली असता ही मुलगी कुठेही सापडली नाही. अद्यापही तिचा शोध लागला नाही.
आपली मुलगी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या ढासला गावातील कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक महेंद्र साठे यांच्याशी बोलत असल्याचे लक्षात आले. मुलीकडे याबाबत विचारपूस केली असता अभ्यासाचं बोलत असल्याचं तिने सांगितलं. यामुळे पालकांनी दुर्लक्ष केलं.
मात्र मुलगी बेपत्ता झाल्याने महेंद्र साठे यांचे मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने करमाड पोलीस ठाण्यामध्ये दिली. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांनी विविध कलमान्वये महेंद्र साठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.