जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पटेलवाडा येथे समाधान कुंभार हे परिवारासह वास्तव्यास आहे. समाधान कुंभार यांची ममुराबाद शिवारात विटभट्टी होती, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह ते भागवत होते. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करत होते. गुरुवारी सकाळी समाधान हे नेहमीप्रमाणे विटभट्टीच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले होते. यावेळी त्याच्यासोबत त्यांचा मुलगा वैभव सुध्दा होता.
ममुराबाद शिवारातील विटभट्टीवर जावून समाधान कुंभार यांनी ऑर्डरनुसार ट्रॅक्टरमध्ये विटा भरल्या. त्यानंतर जळगाव येथील एका बांधकामाच्या ठिकाणी विटांची ऑर्डरप्रमाणे ट्रीप खाली केली. जळगाव शहरात विटांचा माल टाकून आल्यानंतर परत ममुराबादकडे येत असतांना, समाधान यांनी ट्रॅक्टर रस्त्यालगत ममुराबाद शिवारातील म्हाळसादेवी मंदिराकडे उभे केले. त्याठिकाणी काही मिनीटात येतो..तू ट्रॅक्टरवरच बस असे समाधान यांनी मुलाला सांगितले.
ट्रॅक्टरवरून उतरल्यानंतर समाधान कुंभार काही अंतरावर पोहचले आणि याठिकाणी त्यांनी विहिरीत उडी मारली. जातांना दिसणारे वडील अचानक कुठे गायब झाले म्हणून वैभव भांबावला, तो ट्रॅक्टरच्या खाली उतरला. आणि शेजारीच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आरडाओरड करत घटनेची माहिती दिली. मुलाच्या आवाजाने शेतकरी धावत विहिरीजवळ आल्यानंतर यात समाधान यांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली.
सायंकाळी हाती लागला मृतदेह
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे विकास शिंदे, माणिक सपकाळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेहाचा शोध व्हावा म्हणून गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना सोबत आणले. त्यानंतर विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. शर्तीचे प्रयत्न करुनही मृतदेह हाती लागला नाही. अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विहीरीत मृतदेह आढळला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात येवून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला, आणि याच ठिकाणी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री, उशीरा समाधान कुंभार यांच्यावर ममुराबाद येथे शोकाकूल अंत्यंसंस्कार करण्यात आले.
मयत समाधान यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी, जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी विकास शिंदे हे पुढील तपास करत आहेत.