• Mon. Nov 25th, 2024

    नागपूरात एक अनोखा वाढदिवसाचा सोहळा साजरा; वाढदिवसाला चक्क सेंद्रीय खतांचा केक

    नागपूरात एक अनोखा वाढदिवसाचा सोहळा साजरा; वाढदिवसाला चक्क सेंद्रीय खतांचा केक

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : माणसाचे वाढदिवस नेहमीच धडाक्यात साजरे होत असतात; यात एखाद्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करणे विरळच. मात्र, नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी साजरा करण्यात आलेल्या पिंपळ वृक्षाच्या दहाव्या वाढदिवसाने अनोख्या आनंदोत्सवाचा प्रत्यय आला.पिंपळ वृक्षाला भरपूर आयुष्य असते. त्यामुळे त्याला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात. याच वृक्षाखाली बसले असताना तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळे या वृक्षाला बोधिवृक्ष किंवा ज्ञानाचा वृक्ष म्हटले जाते. हा वृक्ष २४ तास ऑक्सिजन देतो. त्याची पाने, फुले, बिया यात औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठीही उपयोग होतो. पुराणातही पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. भगवदगीतेमध्ये श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड म्हणजे त्यांचे स्वत:चे स्वरूप असल्याचे सांगितले आहे.

    दहा वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावरील लोकसेवा ऑटोचालक संघटनेने या परिसरात पिंपळाचे दोन रोपटे लावले. आता मोठ्या झालेल्या या वृक्षांच्या सावलीत प्रवाशी विसावतात. १४ जून रोजी हा वृक्ष लावण्याला दहा वर्षे झाल्याने ऑटो स्टँड परिसरातील वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय ऑटोचालक संघटनेने घेतला. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी यांच्या पुढाकाराने सारी तयारी झाली. वृक्षाचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. झाडाभोवताल फुलांनी रांगोळ्या काढण्यात आल्या. रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले. कोणत्याही वृक्षाचे आवडते खाद्य म्हणजे खत. मग सेंद्रीय खतांचा केक बनवून तो या वृक्षापुढे कापण्यात आला आणि तेच खत या वृक्षाला देण्यात आले. वाढदिवसाचा हा अनोखा सोहळा बघण्यासाठी प्रवाशांनी येथे गर्दी केली होती. सर्वांनीच या वृक्षाला टाळ्या वाजवून दहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी परवीन बनारसे, रवी वालदे, श्याम धमगाये, नरेश कुस्तकर, आसीफ अली, शरीफ, शेख ईसाद, जाकीर अली, दशरथ जहरिल्ले यांच्यासह ऑटोचालक उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed