आतापर्यंत पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात होती; पण आता शेती क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई सुरू केल्याने उपनगरांतील प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे आणि बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहराच्या पूर्व भागात लोहगाव आणि वाघोली गावांत आजही मोठ्या प्रमाणावर जागेची उपलब्धता आहे. या ठिकाणी एक, दोन गुंठे जागा खरेदी करून घरे बांधण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे उपनगरातील गावांतील जागामालक आणि शेतकरी शेती विकास क्षेत्रात जागांचे तुकडे करून अनधिकृतपणे प्लॉटिंग करीत असल्याचे दिसत आहे.
महापालिकेने लोहगाव आणि वाघोली गावांचा विकास आराखडा अद्याप तयार केला नाही. विकास आराखडा मंजूर होण्याआधी शेती क्षेत्रातील जागा सोन्याच्या भावाने विक्री करण्याचा धंदा सुरू आहे. अनधिकृत प्लॉटिंगमुळे बेकायदा बांधकामे उभारण्याला हातभार लागत आहे. त्यामुळे पालिकेने उशिरा का होईना; पण अनधिकृत प्लॉटिंगकडे मोर्चा वळवल्याने भविष्यात येथे होणाऱ्या बेकायदा बांधकामांना चाप बसणार आहे.
पुणे महापालिकेकडून सातत्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाते. पालिकेत समाविष्ट गावांत अनेक ठिकाणी बांधकामाची परवानगी नसणाऱ्या शेती विकास क्षेत्रात जागांचे तुकडे पाडून प्लॉटिंग करणे चालू आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जागा खरेदी करून बेकायदा बांधकामे करू नयेत.- हनुमान खलाटे, उपअभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका
पुणे महापालिकेत लोहगावचा समावेश होऊन सहा वर्षे उलटली; पण अजूनही पालिकेने समाविष्ट गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार केला नाही. विकास आराखडा करताना मोठ्या प्रमाणावर बेकायदा घरे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने लवकर ‘डीपी’ तयार करावा. त्यामुळे अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंगला आळा बसेल.- एक नागरिक