मुंबई महापालिकेने १,७२९ कोटी रुपये खर्चाचा मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, फुटपाथ, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. १६ विविध प्रकारची कामे या सुशोभीकरणांतर्गत केली जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेला अन्य विभागांतील निधीही या कामांसाठी वळवावा लागला आहे.
या प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून या कामाचा मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी १२ मार्च रोजी आढावा घेतला होता. संबंधित परिमंडळाचे, विभागांचे व खात्यांचे सहआयुक्त आणि उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त यांनी आढावा घेऊन काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक तयार करावे, कामांना अधिकाधिक गती द्यावी, विद्युत दिवे आणि पदपथ सुशोभीकरणासारखी कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले होते. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत सुशोभीकरणाची ५० टक्के कामे पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा बैठक घेऊन ऊर्वरित कामे देखिल वेगाने पूर्ण करण्याची सूचना आयुक्त चहल यांनी दिली होती. त्यावेळी १ हजार ८७ कामे हाती घेतली होती त्यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर सुशोभीकरणाची आणखी ८९ कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे एकूण १ हजार १७६ कामांची नोंद झाली. मात्र या कामांना गती देण्याऐवजी त्यांची रखडपट्टीच होत आहे. एकूण कामांपैकी आतापर्यंत एकूण ८४२ कामे पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आयुक्तांनी मार्च अखेरीस घेतलेल्या बैठकीत सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करावी आणि विद्युत रोषणाई कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ही सर्व कामे अद्यापही पूर्ण झाली नसून पावसाळ्यात ती थांबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यानंतर कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.
२४ वॉर्डला प्रत्येकी ३० कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिकेने १,७२९ कोटी रुपये खर्चाचा मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. सुशोभीकरणासाठी प्रत्येक पालिका व़ॉर्डस्तरावर ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. एकूण २४ वॉर्डला ३० कोटी रुपये याप्रमाणे ७२० कोटी रूपये देण्यात आले होते. ऊर्वरित खर्च हा सुशोभिकरणांतर्गंत रस्त्यांचे पुर्नपृष्ठीकरण, पदपथांसह रस्त्यांशी संबंधित अन्य कामांसाठी करण्यात येणार आहे. प्रकल्प मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणार होता. त्यानंतर येत्या पावसाळ्याआधीही सर्व कामे पूर्ण करण्यावर भर होता. मात्र पावसाळ्यानंतर कामे पूर्ण करण्यात येणार आहे.