• Sat. Sep 21st, 2024
मंदिरात प्रवेशासाठी आग्रही, पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट, कोल्हे-भुजबळ संतापले

आळंदी, पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्यात पोलिसांनी आक्रमकपणे वारकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पोलिसांनी हातातील लाठ्याही पोलिसांवर उगारल्या. त्यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र हजारोंच्या संख्येने असलेले वारकरी आक्रमक झाले आहेत. काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंदिरात ४७ दिंड्यांना प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या वारकऱ्यांना प्रवेश नाही, अशांनी प्रवेश देण्याचा आग्रह केला. त्यातून पोलीस आणि वारकऱ्यांच्या झटपट झाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सद्या पोलिसांकडून मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे समोर येत आहे. काही वेळात पालखीचे प्रस्थान होणार असून लाठीचार्जच्या चर्चांवर पोलिसांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सद्या परिसरात शांततेचे वातावरण आहे.

वारकरी संप्रदायाचा हा खूप मोठा अवमान : अमोल कोल्हे

श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत फोनद्वारे सविस्तर चर्चा केली आहे. ही घटना अत्यंत चीड आणणारी असून या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. भागवत धर्माची पताका घेऊन चालणाऱ्या आणि अत्यंत शांततेत भक्तीमार्गाचे आचरण करणाऱ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा खूप मोठा अवमान आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती!

आळंदीत संतापजनक प्रकार, वारकऱ्यांचा अवमान, शासनाने चौकशी करावी : छगन भुजबळ

श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? शासनाने तातडीने याची दखल घेऊन हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed