• Mon. Nov 25th, 2024

    ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पुढील काळात लोक चळवळ व्हावी –  पालकमंत्री दीपक केसरकर

    ByMH LIVE NEWS

    Jun 11, 2023
    ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पुढील काळात लोक चळवळ व्हावी –  पालकमंत्री दीपक केसरकर

    • लाभार्थ्यांची ने-आण व जेवणाची व्यवस्था उत्कृष्टरित्या पार पाडावी – उद्योग मंत्री उदय सामंत
    • १३ जून रोजी दुपारी ४ वा. तपोवन मैदानावर शासन आपल्या दारी उपक्रम होणार
    • लाभार्थींची ने-आण करण्यासाठी ७२० बसेसची व्यवस्था, तर कार्यक्रमाच्या जवळपास १२ ठिकाणी पार्किंग 
    • प्रशासकीय यंत्रणा सज्ज, कोल्हापुरातील हा कार्यक्रम राज्यातील सर्वात मोठा 
    • पालकमंत्री श्री. केसरकर व उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्याकडून तपोवन मैदानावरील तयारीची पाहणी

    कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प शासनाने केला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून हा कार्यक्रम सर्वांचा आहे. या माध्यमातून लोक चळवळ निर्माण होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने या कार्यक्रमानंतर ही अविरतपणे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ पूर्व तयारी आढावा बैठकीस पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक सतीश जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह व  अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम असाच पुढे चालू राहिला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांना आवश्यक असलेल्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करावी. तसेच पुढील  काळात आपल्या विभागामार्फत कोणकोणत्या विकास योजना राबिल्या जाणार आहेत याबाबतचा कृती आराखडा सादर करावा. यात प्रत्येक अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तर प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन हा कार्यक्रम लोक चळवळ बनण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.

    या उपक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थींना देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यात यावी. एकाही लाभार्थीची गैरसोय होणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. प्रशासन व पोलीस विभागाने प्रत्येक तालुक्यातून लाभार्थींना घेऊन येणारी वाहने लाभार्थींना कार्यक्रम स्थळाच्या जवळपास सोडून पार्किंगच्या ठिकाणी जाण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीपूर्वक काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थींच्या नाश्त्याची व जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असून ती जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडावी असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य विभागाने लाभार्थींच्या संख्येनुसार आरोग्य पथके तयार ठेवावीत, त्याप्रमाणेच ॲम्बुलन्सची व्यवस्था ही ठेवावी, असे ही त्यांनी सूचित केले.

    लाभार्थी ने -आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या बसेस मध्ये ज्या ठिकाणाहून लाभार्थी बसणार आहेत त्या ठिकाणचे तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेविका बसेस मध्ये उपलब्ध राहतील. तसेच संबंधित लाभार्थ्यांना प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना समजावून सांगतील व कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेल्या कंपार्टमेंट मध्ये आणून बसवतील याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी निर्देशित केले.

    प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. तसेच या उपक्रमासाठी मंत्रिमहोदयांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन सुधारणा करण्यात येतील व प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमासाठी तयारी पूर्ण होत असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यावर सोपवलेली जबाबदारी ते कार्यक्षमपणे पार पाडतील व हा कार्यक्रम यशस्वी करतील असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. शिंदे व विशेष कार्य अधिकारी श्री. हुक्केरीकर यांनीही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.

    पालकमंत्री श्री. केसरकर व उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्याकडून कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांचा कामांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिल्या व हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

    तपोवन मैदानावरील तयारीची पाहणी

    शासन आपल्या दारी उपक्रम दिनांक १३ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तपोवन मैदानाला प्रत्यक्ष भेट दिली व पाहणी केली. प्रशासनाने उत्तम तयारी केली असून लाभार्थी ने आण करणे तसेच सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात असेही त्यांनी सांगितले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *