धारदार कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. साहिल रणदिवे (वय १९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आकाश बैले (वय २१, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती समोर आली आहे.
शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरातील राजधानी टॉवर्ससमोरील चांदणी चौकात रस्त्यावर महिला आणि तरुणामध्ये वाद सुरू होता. त्यानंतर याठिकाणी आणखी काहीजण आले. यावेळी त्यांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. हे वार डोके, खांदा, पाठीवर करण्यात आले. यामुळे तो रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. या हल्ल्यानंतर जखमी तरुणाला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जास्त रक्तस्त्राव होत असल्याने अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे हलवण्यात आले आहे.
हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव गणेश शंकर पैलवान असे आहे. तो शहरातीलच रहिवासी आहे. या हल्ल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. इतर हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या हल्ल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
राजवाडा येथील राजधानी टॉवर परिसरातील चांदणी चौकात एकावर धारदार कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. साहिल रणदिवे (वय १९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आकाश बैले (वय २१, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत साहिल रणदिवे, आकाश बैले यांना अटक केली. तसेच संबंधित महिलेला उद्या तपासासाठी बोलावले असल्याचे संजय पतंगे यांनी सांगितले.
दोघे युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून साहिल रणदिवे याच्यावर सात गुन्हे दाखल आहे. गणेश बैले हा सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील कोयता जप्त केला आहे. संशयित आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सातारा शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. अशा घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी जाऊन कारवाई करत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे काम पोलीस करत असून जागरुक नागरिक म्हणून पीडितास मदत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.