भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या ‘टिफिन पार्टी’स सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर जिल्ह्यात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात नुकतेच या ‘टिफिन पार्टी’चे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चा पर्याय शोधण्यात आला असून, त्यानिमित्ताने त्या त्या विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख; तसेच इतर कार्यकर्त्यांची संवाद साधण्यात येत आहे.
देशात ४००० बैठका
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था, पुढील मार्च होणाऱ्या लोकसभा-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी भाजपने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या ‘टिफिन पार्टी’चे केंद्रीय स्तरावरून आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या चार हजार बैठका देशभर घेतल्या जाणार आहेत. सुमारे तीन तास चालणाऱ्या बैठकीत एक तास मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील कामगिरीवर चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर जेवणासोबतच संवाद साधण्यात येणार आहे. कार्यकर्ता आणि पक्षातील नेता, यामध्ये कुठलेही अंतर राहणार नाही, यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमाची त्यांची सुरुवात नांदेड येथून करणार असल्याचे समजते.
निवडणुकांची तयारी
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसकडूनही आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघानिहाय पुण्यात बैठका घेतल्या आहेत. काँग्रेसकडून अशा प्रकारच्या बैठका मुंबईत झाल्या आहेत. भाजपनेही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याने नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अक्कलकोट येथे नुकतेच ‘टिफिन पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या संकल्पनेनुसार आपआपल्या घरून जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन करण्यात आले. या वेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.