पदोन्नती झाल्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिल्लीला जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील तरुणाचा नागपूर ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पदोन्नतीचा त्याचा आणि कुटुंबीयांचा आनंद क्षणिक ठरला.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील पंकज वामन भालेराव (३३) हा तरुण मागील २ वर्षांपासून एका फार्मसी कंपनीत मेडिकल प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. नुकतीच त्याची व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून पदोन्नती झाल्याने तो कागदपत्रे पडताळणीकरिता दिल्ली येथे जात होता. यावेळी झाशी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमधून पडून ५ जून रोजी पंकजचा मृत्यू झाला. काल शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पंकज यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असून वडील मोलमजुरी करतात तर लहान भाऊ दुकान चालवतो. पंकज यांच्या कमाईवरच प्रामुख्याने घर चालत होते. पंकज यांचे बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले होते. अत्यंत हुशार असलेल्या पंकजने आपल्या मेहनतीच्या जोरावर मॅनेजर पदापर्यंत मजल मारली होती. पंकजच्या मागे पत्नी, २ मुली, आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.