• Mon. Nov 25th, 2024

    पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! आजपासून पीएमपीची ‘रातराणी’ पुन्हा धावणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

    पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! आजपासून पीएमपीची ‘रातराणी’ पुन्हा धावणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) अचानक बंद केलेली रातराणी बस सेवा उद्या, गुरुवारपासून (८ जून) पुन्हा प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.‘पीएमपी’ने रातराणी बस सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. शहरातील वेगवगेवळ्या भागांतील पीएमपी स्थानकांवर रात्री प्रत्यक्ष जाऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधींनी पाहणी करून वस्तुस्थिती मांडली. ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया प्रशिक्षण घेऊन रुजू झाल्यानंतर त्यांनी तातडीने कोणत्या मार्गांवर रातराणी सेवा सुरू करता येऊ शकते, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा आढावा घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर गुरुवारपासून रातराणी सेवा सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

    पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर प्रत्येकी एका बसच्या माध्यमातून ही रातराणी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रातराणी बसला पूर्वीप्रमाणे मूळ तिकिटापेक्षा पाच रुपये जादा आकारले जाणार आहेत. एका तासाच्या अंतराने रातराणी सेवा सुरू राहणार असून, त्याची माहिती प्रवाशांना व्हावी, यासाठी ठिकठिकाणी त्याची प्रसिद्धी करण्यात येईल. चालक-वाहक प्रवाशांना थांबून रातराणी सेवेबद्दल माहिती देतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस संख्येत वाढ करण्यात येईल, असे संकेत ‘पीएमपी’चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिले.

    प्रवाशांच्या मागणीनुसार शहरातील पाच मार्गांवर रातराणी बस सुरू करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ही सेवा सुरू करत आहोत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी
    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांसाठी मोठी बातमी: अपघात झाल्यास एअर अँब्युलन्स मदतीला धावणार
    रातराणी बसचे सुरू केलेले मार्ग
    मार्गाचे नाव मार्गाचा तपशील

    कात्रज ते वाकडेवाडी स्टँड स्वारगेट, शनिपार, मनपा भवन
    कात्रज ते पुणे स्टेशन स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ
    हडपसर ते स्वारगेट वैदूवाडी, रामटेकडी, पुलगेट
    हडपसर ते पुणे स्टेशन पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकीज
    पुणे स्टेशन ते एनडीए गेट नाना पेठ, लक्ष्मी रोड, डेक्कन कॉर्नर

    (रात्री साडेअकरापासून ते पहाटे साडेपाचपर्यंत काही बस दर तासांनी उपलब्ध होतील, तर काही बसची वारंवारिता दर दीड तासांनी निश्चित केली गेली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार त्यात बदल होईल.)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed