बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेलं केंद्रेवाडी गाव. या ठिकाणी दत्ता गायके (वय वर्ष ४८) यांच्या घरात पुढील दोन दिवसात मंगल कार्य होतं. गायकेंच्या मुलाचा विवाह संपन्न होणार होता. या विवाहासाठीच दत्ता गायके यांच्या दोन मुली आणि जावई हे घरी आले होते.
यापैकी एक जावई म्हणजेच रामेश्वर गोरे हा दुसरं लग्न करायचं आहे म्हणून सासर्यांच्या मागे लागला होता, मात्र साहजिकच सासरे त्याला परवानगी देत नव्हते. लग्न करायच्या मार्गात सासरा आड येत असल्याने जावयाचा पारा चढला होता.
चर्चा करण्यासाठी जावयाने सासऱ्यांना शेतात नेलं. त्या ठिकाणी यावरुन पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की त्याने आपल्या सासऱ्यांवर अनेक वार करत जखमी केले. रात्रभर या घटनेकडे कोणाचं लक्ष न गेल्याने गायके यांचा त्याच ठिकाणी जीव गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नघरात वरपिता दिसत नसल्याने चर्चा सुरू झाली. सकाळी सगळीकडे त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत. मात्र शेतात गायके रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, असं कोणीतरी सांगितलं अन् सगळ्यांच्या पायाखालची जमिनीत सरकली.
हे सगळं दृश्य पाहून तात्काळ पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आलं. या ठिकाणचा पंचनामा पोलिसांनी करत गायके यांची डेड बॉडी शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात पाठवली.
घटनास्थळी गायकेंची जावई रामेश्वर गोरे यांची गाडी आढळून आली. जावई देखील रात्रीपासून गायब असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे गेली. पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केला काही तासात जावई रामेश्वर गोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवतच रामेश्वर गोरे याने आपणच सासऱ्यांचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने माध्यमांना दिली आहे.
येत्या दोन दिवसात ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते, त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसऱ्या लग्नाच्या हट्टापायी जावयाने सासऱ्याचा खून केल्याच्या घटनेने केंद्रेवाडीसह अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गायके यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांची ओळख पंचक्रोशीत होतीय कोरडवाहू जमीन असल्याने गायके हे मजुरीचे काम करायचे आणि त्यातच आपला आणि आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचे, मात्र आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने गायके कुटुंब शोकसागरात बुडाले आहे