• Mon. Nov 25th, 2024

    आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

    ByMH LIVE NEWS

    Jun 7, 2023
    आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

    ठाणे, दि. 7 (जिमाका) :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक उपस्थित होते. वारकरी भवनसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. महानगरपालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार असून यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचे काम करत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी मला आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. वारकऱ्यांची पंढरी असलेल्या पंढरपूर देवस्थानच्या सुशोभीकरण व इतर कामांसाठी व वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष विकास आराखडा बनविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 83 कोटींचा निधी वर्गही केला आहे. पंढरपूर वारी मार्गावर आरोग्य तपासणी व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावर्षीची आषाढी वारी ही मंगलमय, आनंददायी व सुखकारक होईल.

    संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

    पुरातन देवस्थानांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य शासनामार्फत घेत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परदेशी गुंवतणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

    खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून आगरी कोळी वारकरी भवन हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल. येत्या वर्षभरात हे भव्यदिव्य वारकरी भवन उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याण येथे संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल.

    यावेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *