• Mon. Nov 25th, 2024

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे – राज्यपाल रमेश बैस

    ByMH LIVE NEWS

    Jun 7, 2023
    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र ही संतांची, थोरपुरुषांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. या भूमीत जन्माला आलेले बाळासाहेब दौलतराव देसाई यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी सर्व सामान्य जनतेसाठी केलेले कार्य कायमच आठवणीत राहील. त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे होते, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.

    राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालकल्याण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, लेखक मधुकर भावे व्यासपीठावर उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, दौलतराव श्रीपतराव देसाई ऊर्फ बाळासाहेब देसाई यांनी सामान्य परिस्थितीशी संघर्ष करीत आपले नेतृत्व विकसित केले. त्यांचे कार्य सह्याद्री पर्वतासारखे आहे. त्यांचे कार्य सुवर्णअक्षरात नोंदविण्यासारखे आहे. अशा व्यक्तींचे चरित्र सर्वांसमोर आले पाहिजे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची माहिती नव्या पिढीला होते. त्याबरोबरच विधायक कार्य करण्यास प्रेरणा मिळते. राज्याच्या विकासासाठी बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य नेहमीच आठवणीत राहील.

    महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर बाळासाहेब देसाई यांनी विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभागात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून राज्यभर दळणवळणाचे जाळे विकसित केले. त्यांचे आयुष्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांनी राज्यात मजबूत संसदीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर यावे म्हणून त्यांच्या जीवनावरील पाठ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

    विधानसभेचे अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यातून कर्तृत्व घडविले. त्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान दिले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे इबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा होय.

    राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत गरिबीतून पुढे येत शिक्षण घेतले. त्यांनी कष्टातून पुढे आपले विश्व निर्माण केले. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभाग सांभाळताना निर्णय घेत त्यांनी आपला ठसा उमटविला. गरिबांच्या मुलांसाठी घेतलेल्या मोफत शिक्षणाच्या निर्णयामुळे तत्कालिन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यांना शाबासकी दिली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली. लेखक श्री. भावे यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण, ग्राम विकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रकाश सुर्वे, गीता जैन, बालाजी कल्याणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, देसाई कुटुंबीयातील सदस्य, पाटण येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ००००

    गोपाळ साळुंखे/ससं/

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *