माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना २२ मे रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी हे गेल्या अनेक दिवसांपासून अर्धचेतन अवस्थेत आहेत. मात्र त्यांचा श्वासोच्छवास सुरू असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नव्हते.
मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जात जोशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच पक्षाचे सदस्य आहेत. जोशी लोकसभेचे माजी सभापती आहेत. तसेच ते मुंबईचे महापौर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अटबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते.