उमेदवारावर शिक्कामोर्तब निवडणुका लागतील तेव्हा होईल, असा सूचक इशारा विलास लांडे यांनी दिला आहे. म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठकीनंतर सगळं काही आलबेल आहे, असं लांडेंच्या वक्तव्यानंतर दिसत नाही.
विलास लांडे यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी परिसरात झळकले होते. त्यामुळे शिरूर लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. विलास लांडेंच्या या बॅनर्सबद्दल अमोल कोल्हेंना विचारले असता त्यांनी “शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही” असे म्हणत आपले इरादे स्पष्ट केले होते. तसेच “पवार साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण” हे मला मान्य आहे, असे म्हणत कोल्हेंनी शिरूर लोकसभेच्या उमेदवारीचा चेंडू पवारांकडे टोलवला होता.
आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. पुण्यातील मार्केट यार्डच्या निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील बैठकीसोबतच ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
शिरूर लोकसभेसाठी पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता अंतर्गत गट बाजी निर्माण होईल का? याची चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लागली होती. मात्र, आजच्या बैठकीनंतर पवारांनी कोल्हे यांचं नाव जाहीर केल्यानंतर विलास लांडे यांनी स्वागत केले.
“शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. शिरूर लोकसभा निवडणुकी संदर्भात पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना निवडणूक लढवावी लागेल. मात्र शिक्कामोर्तब झालं नाही. निवडणुका लागल्या की शिक्कामोर्तब होईल” असं मत विलास लांडे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुका लागल्यानंतर काय चित्र असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.