हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ५ जून रोजी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात मात्र बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता…
IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच ५ जून रोजी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ जून रोजीही बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून यानंतर मात्र काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसतील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाचं सावट…
दरम्यान, आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा ४ जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. अरबी समुद्रात आता कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता वर्तवण्यात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची प्रगती वेगाने होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘आयएमडी’ने शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार ५ जूनला आग्नेय अरबी समुद्रात वातावरणात चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता असून, त्यापुढील ४८ तासांत तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. एका हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.
या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा जोर वाढू शकतो. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस होऊन मान्सूनची प्रगतीही वेगाने होऊ शकते, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.