हे दाम्पत्य वीटभट्टीत काम करते. ते आपल्या मातीच्या घरात झोपले होते. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पत्नी रुख्मिणी विश्वकर्मा हिला काहीतरी चावले. तिने पती पूरणला उठविले. आजूबाजूला बघितले तर साप बाहेर पडताना दिसला. पूरणने लगेच परिसरातील एक मित्राच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) गाठले आणि रुख्मिणीला दाखल केले. तब्बल पाच तासांनंतर त्या सापाने आपल्यालाही दंश केल्याची बाब पूरणच्या लक्षात आली. वेळीच उपचार मिळाल्याने रुख्मिणीच्या प्रकृतीत सुधारणा आहे. मात्र, आपल्याला साप चावल्याचे उशिरा लक्षात आल्याने पूरणची प्रकृती खालावत चालली आहे. पूरण आणि रुख्मिणी ज्या घरात झोपले होते, त्याच घरात त्यांचा मुलगाही होता. मध्यरात्री दोन वाजता साप चावल्यानंतर तीनच्या सुमारास ते मेडिकलमध्ये पोहोचले. पाच तासांनंतर म्हणजे रविवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास पूरणलाही त्रास जाणवायला सुरुवात झाल्याने त्याने आपल्या मित्राला ही बाब सांगितली. मित्राने वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदक्कर यांना सांगितले. नितीश यांनी ही लक्षणे साप चावल्याची असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर लगेच संबंधित डॉक्टरांना कळविण्यात आले. त्यानंतर पूरणवरही उपचार सुरू करण्यात आले.
लक्षणांवरून हा साप मण्यार जातीचा असल्याची शक्यता नितीश यांनी व्यक्त केली. सर्पदंश झालेल्या दाम्पत्याला नितीश यांच्यासह राकेश भोयर, साहीर शरणागत रुग्णालयात जाऊन सहकार्य करीत आहेत.