• Sat. Sep 21st, 2024
Pune News : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अनागोंदी कारभार; हरकतींच्या बाहण्याने सिनेट सदस्यत्व रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केवळ हरकती आल्या म्हणून नऊ नामनिर्देशित सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या कोणतीही सूचना किंवा प्रक्रिया न राबवता वीस दिवसांत रद्द केल्या आहेत. याचा फटका विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह ज्येष्ठ सिनेट सदस्यांना बसला आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ठरावीक लोकांची सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकल्यामुळेच नियुक्त्या रद्द केल्या, असा आरोप करण्यात येत आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवर विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार सरकारी विद्यापीठांकडून सदस्यांची नेमणूक करण्यात येते. त्यानुसार नऊ जणांची चार मे रोजी सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी यांनी नियुक्त्यांचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर जेमतेम १८ दिवसांतच, हरकती नोंदवल्यामुळे नियुक्त्यांबाबत डॉ. बंगाळ यांनी नियुक्त्यांचे परिपत्रक मागे घेत असून, शहानिशा करून अंतिम यादी प्रसिद्ध करू, असे परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठ प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबाबत सदस्यांनी आक्षेप नोंदवला असून, कायद्यातील कलम ४०चा भंग असल्याचे म्हटले आहे.

विद्यापीठाची बाजू समजून घेण्यासाठी कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही, संपर्क होऊ शकला नाही. या विषय़ाबाबत विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

आजचा अग्रलेख : शतायुषी अमेरिकी चाणक्य
राजकीय दबावामुळे नियुक्त्या रद्द ?

सरकारी विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळांचे सदस्य किंवा सिनेटमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून ठरावीक लोकांचीच नियुक्ती व्हावी, यासाठी उच्चपदस्थ शासकीय यंत्रणेकडून दबाव निर्माण केला जात आहे. याचेच उदाहरण म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून आधी नियुक्ती करणे आणि त्यानंतर राजकीय दबाव आला, की संबंधित नियुक्त्या केवळ हरकती आल्या म्हणून रद्द करणे, असे विद्यापीठाच्या कार्यशैलीला न शोभणारे प्रकार सुरू असल्याची टीका सदस्यांकडून केली जात आहे.

यांच्या नियुक्त्या रद्द

माजी प्र-कुलगुरू डॉ. गजानन एकबोटे – (एसएनडीटी महिला विद्यापीठ)

डॉ. सुशिर पांडे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डॉ. मिलिंद देशपांडे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ. यशवंत पाटील – स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ

डॉ. आशुतोष गुप्ता – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

डॉ. संजीव चौधरी – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

डॉ. सतीश शिंदाडकर – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

डॉ. विठ्ठल धाडके – पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ

डॉ. विनोद चौधरी – गोंडवाना विद्यापीठ

नियुक्त्या रद्द करतांना पूर्वसूचना दिली नाही, हरकतींबाबत कोणतीही माहिती सदस्यांना दिली नाही, कोणतीही सुनावणी घेतली नाही. या विरोधात विद्यापीठाकडे दाद मागण्यासाठी कुलसचिव डॉ. बंगाळ यांच्याकडे तक्रार करून दहा दिवस झाले. मात्र, कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

– डॉ. गजानन एकबोटे, माजी प्र कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed